मुंबई – उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आता शिगेला पोहचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे दसऱ्याला मेळावा घेणार आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच ‘दिघे’ होता येत नाही. काही जण ‘शिंदे’ होतात… असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातुन दिघे नक्की कोण होते? यावर प्रकाशझोत टाकत ‘रोखठोक’ भाष्य केलं आहे.
शिंदेंचं डोकं नाही भाजपचे कारस्थान
सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला. आमचीच शिवसेना व आमचाच दसरा मेळावा. अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
‘धर्मवीर’ सिनेमावरून निशाणा
महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून ‘धर्मवीर’ सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. असा आरोप देखील सामनातून करण्यात आला आहे.
शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली असल्याची सडकून टीका यावेळी रोखठोखमधून करण्यात आली आहे.