शेवगाव – शेवगावचे तहसील कार्यालय पाथर्डी रस्त्यावरील नव्या अद्ययावत आरसीसीच्या वास्तूमध्ये स्थलांतरित होऊन अकरा वर्षे झाली. तेव्हापासून जुनी वास्तू धूळखात पडली होती. ब्रिटीशांनी सुमारे 90 वर्षांपूर्वी उभारलेली ही जुनी वास्तू आज देखील आकर्षक व भक्कम असल्याची पारख पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केली. त्यांच्याच प्रयत्नामुळे या वास्तूने कात टाकली आहे. या वास्तूची अंतर-बाह्य रंगरंगोटी केल्याने अतिशय देखणे रूप धारण केले असून, आज या वास्तूत शेवगाव पोलीस ठाणे स्थलांतरित करून त्याचे औपचारिक उद्घाटन पोलीस अधीक्षक ओला यांचेहस्ते करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव, रमजान ईद, दिवाळी असे उत्सव तोंडावर आल्याने शेवगावमधील गणेश मंडळ, शांतता समिती, ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन या वास्तूच्या उद्घाटनाच्या निमित्ताने करण्यात आले.
पोलीस अधीक्षक ओला यांनी उत्सवा संदर्भात काही सूचना करायच्या असतील त्या कराव्यात, असे आवाहन सर्वांना केले. तेव्हा नवनाथ कवडे, मनोज कांबळे, जगदीश धूत, गणेश रांधवणे, डॉ.नीरज लांडे पाटील, आशुतोष डहाळे, महेश लाटे आदींनी शेवगावातील मिरवणूक मार्गाच्या दुरुस्ती, रस्त्यात लोंबकळणाऱ्या विद्युत तारा व अतिक्रमणाबाबत सूचना केल्या. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या वेळी प्रत्येक मंडळास प्रमुख चौकात डाव दाखविण्यास पुरेसा वेळ मिळावा आणि मानाच्या गणपतीच्या पारंपारिक विसर्जनाच्या मार्गाव्यतिरिक्त अन्य भागातील गणेश विसर्जन मार्गावर सुरक्षा द्यावी आदी विधायक सूचना केल्या.
अधीक्षक ओला यांनी सर्व मागण्या सकारात्मक मान्य करत डीजेला परवानगी राहणार नाही. पारंपारिक वाद्याच्या आवाजाची देखील “नॉईस मीटर’ द्वारे नोंद घेतली जाईल. अधिक आवाज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, असा स्पष्ट इशारा देत देखावे सादर करताना सामाजिकतेचे भान ठेवावे. कोणाचीही सामाजिक भावना दुखावणार नाही, असे देखावे सादर करू नयेत. सोशल मीडियाचा चुकीचा वापर होणार नाही यावर लक्ष द्यावे. एखादी पोस्ट आक्षेपार्ह आढळल्यास पोलिसांना कल्पना द्यावी. गणेश मंडप रस्त्यात उभारून रहदारीस अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यात किमान तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.तसेच वीज वितरण कंपनीकडून अधिकृत कनेक्शन घ्यावे, आकडे टाकू नयेत, अशा मौलिक सूचना करून पोलिस प्रशासनास समन्वय ठेवण्याचे आवाहन केले.
बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक सुनील पाटील, शेवगावचे प्रभारी आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सर्व पोलीस स्टाफ, तहसीलदार प्रशांत सांगडे, गटविकास अधिकारी राजेश कदम, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रल्हाद पाठक, ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, सचिन आधाट, दिनेश लव्हाट, वजीर पठाण, अमर शेख, सागर फडके, विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, डीजे चालक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक संपताच ओला यांनी शेवगाव शहरात अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत अडचणींची पाहणी करून सूचना दिल्या.