वडगाव हवेली – जिल्ह्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराड तालुक्यातील दक्षिण भागात करोना साथीचा कहर सुरुच आहे. शेरे स्टेशन (शेणोली) परिसरातील सात जणांचे रिपोर्ट बुधवारी (दि. 27) रात्री पॉझिटिव्ह आल्याने येथील रुग्णांची संख्या आता दहावर गेली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात दि. 23 रोजी तीन रुग्ण सापडले होते. सर्व रुग्णांची मुंबई प्रवासाची पार्श्वभूमी आहे. येथील करोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नेहरूनगर-कुर्ला (मुंबई) येथून शेरे-शेणोली स्टेशन येथे एकाच कुटुंबातील सतरा सदस्य आले होते. या कुटुंबाला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील पाच जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने दि. 21 रोजी कराड येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील तिघांचे रिपोर्ट दि. 23 रोजी पॉझिटिव्ह आले. कुटुंबातील उर्वरित चौदा जण व त्यांच्या संपर्कात आलेल्या चार जणांना कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात क्वारंटाइन करण्यात आले होते.
त्यांचे रिपोर्ट बुधवारी (दि. 27) रात्री उशिरा आले. 38 वर्षे, 35 वर्षे, 24 वर्षे, 28 वर्षे वयाचे पुरुष, 35 वर्षांची महिला, 12 व 6 वर्षांच्या दोन मुली, अशा सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर इतरांचे निगेटिव्ह आले आहेत. शेरे-शेणोली स्टेशन परिसरातील एक किलोमीटरचा भाग कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका घरोघरी सर्वेक्षण करत आहेत.