तिने चक्क सुपरस्टारला नाकारले

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमकथांचा तुटवडा नाही. ना पडद्यावर, ना पडद्यामागे. चित्रपट जसे अध्यात्म आणि ऐतिहासिक ट्रॅकवरून बाजूला सरकले तसा चित्रपटांत प्रेमकथांचा उदय झाला. तो आता जवळपास शतक होत आले तसाच कायम आहे. अनेक प्रेमकथांनी येथे पडद्यावर आणि पडद्यामागेही इतिहास रचला. काही प्रेमकथा विवाहाच्या वेदीपर्यंत पोहोचल्या, तर काहींनी त्याच्या अगोदरच मान टाकली.

चित्रपटसृष्टीच्या प्रेमकथांची जेव्हा चर्चा सुरू होते, तेव्हा त्यात एक जोडीचा हमखास समावेश असतो. ती म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना आणि त्याची रिअल लाइफमधील नायिका अंजू महेंद्रू.

अंजू आणि राजेश यांची प्रेमकथा साठच्या दशकातील. दोघे होतकरू. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यासाठी धडपडत होते. अंजू मॉडेलिंगमध्ये बऱ्यापैकी रूळत होती. तर राजेश खन्नाकरता नशिबाने दारे किलकिली केली होती. युनायटेड फिल्म प्रोड्युसर्स असोसिएशनला राजेश खन्ना या वीशी ओलांडलेल्या युवकात स्टार मटेरियल सापडले होते. हिरो म्हणून त्यांनी त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यावेळी या दोघांची प्रेमकथा सुरू होती.

अंजू राजेशशी अगदी कमिटेड होती. एखादी पत्नी नवऱ्याच्या प्रत्येक प्रयत्नांत, स्वप्नाच्या पाठलागात जशी त्याच्या बाजूने समर्पितपणे उभी राहते, तसेच अंजूचे राजेश खन्ना यांच्या बाबतीत होते. तिच्या आईलाही राजेश आवडायचा. प्रेमात म्हटला तर तसा कशाचाच अडथळा नव्हता. राजेशच्या आग्रहाखातर तिने आपले चित्रपट क्षेत्रातील करिअरही बाजूला ठेवले. केवळ राजेश आणि त्याची स्वप्ने हेच तिचे जग. राजेश खन्नाची डिव्होटेड आणि अधिकृत गर्लफेंड म्हणून तिचा लौकीक झालेला. असे म्हणतात जवळपास सात वर्षे दोघे लिव्ह इन मध्ये होते.

आणि काळ बदलला. 1969 उजाडले. राजेश खन्ना यांचा आराधना रिलीज झाला. एका रात्रीत राजेश खन्ना यांचे नशिब बदलले. ते अचानक लाखो तरूणींच्या गळ्यातले ताईत बनले. दिलीप- देव- राज या त्रिकुटालाही मिळाली नाही अशी लोकप्रियता राजेश खन्ना यांनी अर्जित केली. किंबहुना एका सुपरस्टारचा जन्म झाला. त्यापेक्षाही सुपरस्टार ही संज्ञा राजेश खन्ना यांनीच जन्माला घातली असेही म्हणता येउ शकते.

स्टारडम मिळाल्यानंतरही राजेश आणि अंजू यांची प्रेमकथा सुरूच होती. नंतर मात्र क्‍लॅशेश होउ लागले. अंजू यांनीच एका मुलाखतीत याची कबुली दिली आहे. त्यांच्या मते राजेश खन्ना काहीसे पारंपरिक विचारसरणीचे होते. त्यांना साधारण मुलगी आवडत असे. म्हणजे मी तसे राहावे असे त्यांना वाटायचे. मात्र त्याचवेळी अत्यंत मॉडर्न अशा तरूणींकडेही ते आकर्षित होत असत. मी स्कर्ट घातला तर साडी का नाही नेसली असा त्यांचा सवाल असायचा, तर साडी नेसली तर मी भारतीय नारीचा लूक का प्रोजक्‍ट करते आहे असेही त्यांचे म्हणणे असायचे.

अशा घटनांतून वाद होत गेले. मतभेद वाढत गेले आणि अखेर त्याची परिणती त्यांचे वेगळे होण्यात झाली. मात्र ज्या काळात राजेश अंजू एकत्र होते, त्या काळात राजेश यांनी आपल्या प्रेमाचा आणि मिळालेल्या संपत्तीचा अंजू यांच्यावर वर्षाव करण्यात कोणतीही काटकसर केली नाही असेही म्हणता येउ शकते.

दोघे वेगळे झाल्यानंतरही त्यांच्याबद्दलच्या अनेक कथा तिखटमीठ लावून परोसल्या गेल्या. अंजूचे वेगळे होणे राजेश यांना मान्य नव्हते. ते संतापले होते. सूड घेण्यासाठी त्यांनी तिचे करिअर संपवण्यासाठी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली. मात्र त्याचवेळी चित्रपटसृष्टीतल्या व्यक्तींनी या दोघांचा एकत्रित काळ बघितला होता. त्यांच्या मनात अंजूबद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. तिला असे पटलावरून गायब करणे त्यांना मान्य नव्हते. मात्र राजेश खन्ना मोठा….खूप मोठा स्टार झाला होता. बॉक्‍स ऑफिसवर त्याच्या केवळ नावाने गर्दी खेचली जात होती.

अंजू राजेश लव्ह स्टोरीत या सुपरस्टारच्या वाट्याला अगदी निगेटिव्ह अशीच प्रसिध्दी आली. राजेश खन्ना यांनी डिंपल कापडीया यांच्याशी विवाह केला. असे सांगितले जाते की विवाह स्थळी जाण्यासाठी राजेश खन्ना यांनी मुद्दाम बारात अथवा मिरवणूक अंजू यांच्या घरावरून नेली होती.

या कुप्रसिध्दीचा राजेश यांना व्यायसायिक जिवनात फार फटका बसला नाही. त्याला कारण लाखो तरूणी आणि विवाहित महिलांनी राजेश खन्ना या सुपरस्टारला आपल्या मनाच्या मंदिरात स्थान दिले होते. त्याची कार ज्या रस्त्याने जायची त्या रस्त्यावरची धुळही त्या आपल्या मांग मध्ये भरत होत्या. इतकी लोकप्रीयता अन्य कोणत्याही सुपरस्टारला मिळाली नाही. ना त्याच्या अगोदर ना नंतरच्या काळात.

पण राजेश खन्ना यांच्याबद्दल असाही प्रवाद आहे. ते पडद्यावर परफेक्‍ट रोमॅंटीक हिरो होते. त्यामुळेच त्यांना महिला वर्गाचे इतके प्रेम मिळाले. मात्र वास्तविक जिवनात त्यांचे वागणे याच्या अगदी उलट होते. जी महिला त्यांच्याशी कमिटेड होती त्या अंजू महेंद्रुशी ते कमिटेड राहीले नाहीत. तर जिच्याशी त्यांनी विवाह केला त्या डिंपल कापडीया यांच्याशीही ते एकरूप होऊ शकले नाहीत असे त्यांच्याबद्दल बोलले गेले.

पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. राजेश खन्ना यांची जी इमेज सादर केली गेली ती कदाचित ती खरी असेल किंवा नसेलही. मात्र याचा दुसरा पैलूही सांगितला जातो. राजेश खन्ना यांनी विवाह करावा अशी त्यांच्या आईची व अंजू यांच्या आईचीही इच्छा होती. त्यांनी अंजू यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला होता. मात्र अंजू यांची तेव्हा करिअरसाठी त्यास नकार दिला.

तेव्हा वेस्ट इंडिज क्रिकेट संघातले स्टार सर गॅरी सोबर्स त्यांच्या आयुष्यात आले होते. तो 1971 चा काळ. त्यानंतर लगेचच इम्तियाझ अलिचा त्यांच्या जिवनात प्रवेश झाला. हे राजेश खन्ना यांना मानवणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपला मार्ग बदलला.

बॉबी हा डिंपल कापडीया यांचा पहिलाच चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आठ महिने अगोदरच त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
हे जरी असले तरी 1988 मध्ये अंजू राजेश खन्ना यांच्या आयुष्यात परत आल्या. 1972 मध्ये वेगळे झालेले त्यांचे मार्ग 1988 मध्ये पुन्हा सांधले गेले.

मात्र यावेळी अंजू त्यांच्या आयुष्यात आल्या त्या त्यांची एक चांगली मैत्रिण म्हणून व ही मैत्री अखेरपर्यंत म्हणजे राजेश खन्ना यांचे निधन झाले तोपर्यंत टीकली. राजेश खन्ना यांनी जगाचा निरोप घेतला त्यावेळी जी मोजकी मंडळी त्यांच्यासोबत होती, त्यात अंजू एक होत्या.

एका मुलाखतीत स्वत: अंजू यांनी केलेले भाष्य राजेश खन्ना यांच्याबद्दल जे काही निगेटिव्ह प्रकाशित झाले त्याबद्दल शंका निर्माण करणारे ठरले. तेव्हा अंजू म्हणाल्या होत्या, राजेश यांनी विवाहाचा प्रस्ताव दिला होता. तो नाकारून मी खूप मोठी चूक केली असे मला वाटते. त्यावेळी प्रगल्भता नव्हती. एका सुपरस्टारची मी पत्नी राहीले असते.

वयाच्या 13 व्या वर्षी सुरू झालेला अंजू महेंद्रू यांचा प्रवास आज वयाच्या 74 व्या वर्षीही सुरू आहे. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांत त्यांनी अजुनही चाहत्यांच्या लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या आहे.

प्रख्यात शायर कैफी आझमी यांची सर्वप्रथम त्यांच्यावर दृष्टी पडली. त्यांनी बासुदांना अर्थात बासू भट्टाचार्य यांना अंजू यांच्या नावाची शिफारस केली. बासूदांचाही तो पहिलाच चित्रपट उसकी कहानीं. त्याद्वारे त्यांचे चित्रपटसृष्टीत आगमन झाले. नंतर त्यांनी अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. मात्र त्या नायिका म्हणून कधी पुढे आल्याच नाहीत.

त्या नायिका होत्या फक्त एकाच व्यक्तीच्या…. बॉलिवूडमधील न भूतो न भविष्यती अशा सुपरस्टार राजेश खन्नाच्या! त्याही वास्तविक जिवनातील. मायानगरीतल्या रूपेरी पडद्यावरील नाही. मात्र त्यांची ती संधी हुकली अन त्या मिसेस राजेश खन्ना झाल्याच नाहीत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.