कोल्हापूर – नैराश्य आणि एकतर्फी प्रेमातून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय उचलण्याची धक्कादायक मालिका कोल्हापूर जिल्ह्यात सुरुच आहे. आता या मालिकेत जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील तरुणाची भर पडली आहे. एकतर्फी प्रेमातून अपयश आल्याने विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) असे त्या तरुणाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने आयुष्याचा शेवट केला.
मंगळवारी ही उघडकीस आली. या घटनेची नोंद चंदगड पोलिसांत झाली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यामध्ये त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतले आहे. तिला मी विसरू शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी!
स्टेटस ठेवत तरुणाची “वारणे’त उडी
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये मांगले येथील तुषार पांढरबळे या तरुणाने प्रेमकरणातून वारणा नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. मयत तुषारचा मूळ ठिकाणापासून तब्बल 40 किमी दूर वारणा नदीपात्रात त्याचा मृतदेह सापडला. तुषारने प्रेम प्रकरणातून मांगले-सावर्डे दरम्यानच्या बंधाऱ्यावरुन मोबाईलवर स्टेटस ठेवत वारणा नदीपात्राच्या पुराच्या पाण्यात उडी मारली होती.