तेहरान – इराणमध्ये हिजाब परिधान करण्याच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची ओळख पटवण्यासाठी आता कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवली जाणार आहे. इराणमध्ये 1979 च्या इस्लामी क्रांतीनंतर लागू करण्यात आलेल्या शरीया कायद्यांतर्गत महिलांना हिजाब परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
या कायद्याचा भंग केल्यास सार्वजनिक निषेध, दंड किंवा अटकेची शिक्षा होते. मात्र माहसा आमिनी या 22 वर्षीय युवतीच्या कोठडीतील मृत्यूनंतर सुरू झालेल्या आंदोलनात देशातील हजारो महिलांनी हिजाब परिधान करणे बंद केले आहे.
मात्र तरीही इराणच्या प्रशासनाने अजूनही महिलांना हिजाब घालण्याची सक्ती मागे घेतलेली नाही. तणाव आणि संघर्षाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
या कॅमेऱ्यांमध्ये ज्या महिला हिजाब न घातलेल्या दिसतील, त्यांना अगोदर समज दिली जाईल. कुटुंबाची माहिती गोपनीय ठेवून सामाजिक मूल्ये जपण्यासाठी कायद्याविरोधात केली जाणारी कोणतीही कृती सहन केली जाणार नाही, असे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.