नवी दिल्ली – अदानी समूहाचे कॉर्पोरेट ब्रॅंड कस्टोडियन आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे प्रमुख अमन कुमार सिंह ज्यांना छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करावा लागत आहे, त्यांनी एनडीटीव्ही लि.च्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे.
अमनकुमार सिंह यांनी आपल्या व्यक्तिगत कारणांमुळे 1 एप्रिल 2023 पासून एनडीटीव्ही संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याची माहिती अदानी ग्रुुपच्या वतीने देण्यात आली आहे. अमनकुमार सिंग हे छत्तीसगड मधे भाजप सरकारच्या काळात एक शक्तिशाली नोकरशहा मानले जात होते व ते तत्कालिन मुख्यमंत्री रमणसिंह यांचे प्रधान सचिव म्हणूनही काम करीत होते.
नोव्हेंबर 2022 मध्ये अदानी समुहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतला तेव्हापासून ते या कंपनीच्या संचालक मंडळावर होते. त्यांच्यावर फेब्रुवारी 2020 मध्ये छत्तीसगड आर्थिक गुन्हा शाखेने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील गुन्हा कायम ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.