मुंबई – शेअर बाजार निर्देशांक कमालीच्या उच्चांकी पातळीवर असूनही सोमवारी जोरदार खरेदी होऊन शेअर निर्देशांक वाढत राहिले. एक तर लसीकरणाचे काम काही दिवसातच सुरू होणार आहे, त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राची उत्पादकता वाढली असल्याची आकडेवारी आज जाहीर झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केल्याचे विश्लेषकांनी सांगितले.बाजार बंद होताना मुंबई शेअर
बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 0.64 टक्क्यांनी म्हणजे 307 अंकांनी उसळुन 48,176 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 114 अंकांनी म्हणजे 0.82 टक्क्यांनी उसळुन 14,132 अंकावर बंद झाला.
सोमवारी माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाली. टीसीएस, इन्फोसिस ओएनजीसी, एचयुएल, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्रा, एल अँड टी या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्याचे दिसून आले. सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या करोनावरील लसीला औषध नियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मनुष्यबळाची कमतरता जाणवणार नाही असे गुंतवणूकदारांना वाटते.
आनंद राठी या संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, दरम्यानच्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरींग क्षेत्राची उत्पादकता वाढल्याची आकडेवारी समोर आल्यामुळे गुंतवणूकदार आनंदित झाले आहेत. लसीकरणामुळे जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश येत असल्यामुळे खरेदी वाढली आहे. उरलेल्या आठवड्यात याच कारणामुळे सेन्सेक्स व निफ्टी दोन टक्क्यांनी वाढले. या आठवड्यात बऱ्याच कंपन्यांचे ताळेबंद जाहीर होणार आहेत. त्याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदार गुंतवणूक करीत आहेत, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटत आहे. याबाबत विश्लेषकांनी सांगितले की, यात बराच वाटा परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा आहे.