पुणे (प्रतिनिधी) – ग्राहक हितास प्राधान्य देऊन कायद्यामध्ये बदल करत केंद्र शासनाने नुकताच ग्राहक संरक्षण कायदा पारीत केला. या कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहचून त्याचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या हक्क, संरक्षण, प्रशिक्षणात पुणे नेहमीच अग्रेसर राहिले आहे, असे मत वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
ग्राहकांना नवीन कायद्याचे मार्गदर्शन तसेच त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी ग्राहक सेवा संस्थेचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार तडस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी, डॉ. भूषण कर्डिले, गजानन शेलार, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वाठारकर, ग्राहक सेवा संस्था महाराष्ट्रचे अध्यक्ष अॅड. महेंद्र दलालकर, प्रकाश शिंदे उपस्थित होते.
ग्राहकाचे हक्क व अधिकार याचा प्रचार व प्रसार करून ग्राहकांना त्याच्या कायदेशीर अधिकाराबद्दल जागरूक करण्याचे काम ग्राहक सेवा संस्था करते. सामाजिक बांधिलकीतून ग्राहक सेवा संस्थेचे मुख्य संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असल्याची माहिती अॅड. महेंद्र दलालकर यांनी दिली.