यशवंत सिन्हांच्या यात्रेत शरद पवार होणार सहभागी

मुंबई : भाजपमधून बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात उद्यापासून (बुधवार) यात्रा काढणार आहेत. त्या यात्रेचा प्रारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. एवढेच नव्हे तर, पवार त्या यात्रेत सहभागीही होणार आहेत.
सिन्हा यांच्या यात्रेला गांधी शांती यात्रा असे नाव देण्यात आले आहे.

त्या यात्रेचा प्रारंभ मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून होईल. दिल्लीतील राजघाट येथे 30 जानेवारीला यात्रेची सांगता होईल. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली अशा सहा राज्यांतून जाणाऱ्या यात्रेचा प्रवास 3 हजारहून अधिक किलोमीटर होईल.

यात्रेचा प्रारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला सिन्हा यांनी येथे पवार यांची भेट घेतली. त्या भेटीनंतर पवारही यात्रेत सहभागी होणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आली. सिन्हा यांच्या यात्रेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही पक्षाकडून करण्यात आले.

विविध मुद्‌द्‌यांवरून सिन्हा सातत्याने मोदी सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. सध्या वादग्रस्त ठरलेल्या का च्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. अशातच सिन्हाही त्यांच्या यात्रेसाठी सज्ज झाले आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.