Rahul Gandhi – उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या भेटीगाठींविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना प्रश्न विचारायला ते काही पंतप्रधान नाहीत. ते अदानींचा बचाव करण्याचा प्रयत्नही करताना दिसत नाहीत, अशी भूमिका कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी मांडली.
हिंडेनबर्ग या अमेरिकास्थित संस्थेने काही महिन्यांपूर्वी अदानी समुहावर अनियमिततेचे आरोप केले. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेससह इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीतील बहुतांश पक्षांनी संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशीची मागणी लावून धरली.
मात्र, पवार यांच्या अदानींसमवेतच्या भेटीगाठी विरोधी पक्षांच्या भूमिकेशी विसंगत स्वरूपाच्या ठरल्या. त्या पार्श्वभूमीवर, पवार यांना अदानींच्या भेटीगाठींविषयी काही विचारले का, असा प्रश्न राहुल यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.
त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. पवार पंतप्रधान असते आणि अदानींचा बचाव करत असते; तर मी त्यांना नक्की प्रश्न विचारला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींचा बचाव करत आहेत. त्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारत आहे, असे राहुल म्हणाले.