sharad pawar group – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली, मग त्यांच्याशिवाय पक्ष कसा काय असू शकतो, असा सवाल शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी उपस्थित केला. तर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कार्याध्यक्ष पदाची नियुक्ती चुकीची असल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु झाली. याबाबत निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी अजित पवार गटाकडून वकिल मुकुल रोहोतगी, तर शरद पवार गटाकडून वकिल देवदत्त कामत आणि अभिषेक मनु सिंघवी हे युक्तिवाद करत आहे.
शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, राज्यस्तरावरील 28 पैकी 20 पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत. तसेच नॅशनल वर्किंग कमीटीमधील 86 पैकी 70 सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
आम्ही आयोगात सादर केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र खरे आहे. समोरच्या गटाकडून जसे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले तसे आम्ही केले नाही. हवं तर तुम्ही तपासून पाहू शकता. तसेच जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर शंका उपस्थित केली, ते अवैध आहे, असा दावा त्यांनी केला.
तुम्ही लढवलेल्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांनी दिलेले एबी फाॅर्म वापरले आहेत. यामुळे शरद पवार सोडुन राष्ट्रवादी होऊ शकत नाही. अनेक वेळा मुख्यमंत्री, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री ते राहीले आहेत. त्यांनीच या पक्षाची स्थापना केली, असा युक्तीवाद त्यांनी केला.