शनिशिंगणापूर (वार्ताहर) – श्रावण महिना सुरू होत असल्याने शनिशिंगणापूर येथे दररोज पहाटे 5 ते 7 यावेळेत महिनाभर शनिचौथरा भाविकांसाठी खुला झाला. सकाळी दोन तास भाविकांना मोफत दर्शन व्यवस्था असणार आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली. या काळात भाविकांना थेट मूर्तीला जल अर्पण करून तेलाने अभिषेक करता येणार आहे.
श्रावण महिन्यात शनिदेवाच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने राज्यभरातील भाविक येत असतात. त्यामुळे या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. शनिशिंगणापूरात प्रथेप्रमाणे दरवर्षी श्रावण महिन्यात चौथर्यावर जाऊन जल घालण्याची परंपरा आहे. त्यातच श्रावण महिन्यापासून सकाळी दोन तास भाविकांना मोफत दर्शन व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
आजपासून सकाळी दोन तासांच्या कालावधीत थेट शनिदेवाच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी गर्दी झाली होती. श्रावण महिन्यामध्ये परिसरातील युवक एक महिनाभर शनिमूर्तीला पाणी टाकत असतात. त्यांना आता सकाळी दोन तासांच्या कालावधीत थेट चौथर्यावर जाऊन जल अर्पण करता येणार आहे. श्रावण महिन्यात राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक येत असल्याने येथे कायमच गर्दी होत असते. देवस्थान प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात येते.
दरम्यान, इतर काळात चौथरा दर्शनासाठी बंद असतो मात्र, भाविकांना पाचशे रुपये पावती देऊन चौथर्यावर जाऊन दर्शन घेत तेल अर्पण करता येते. देवस्थानच्या या निर्णयामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.