मुंबई: शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कारशेडमध्ये उभ्या एक्स्प्रेसमध्ये सफाई सुरु असताना या कांड्या सापडल्या आहेत. बॉम्बशोधक पथकाकडून स्फोटकाला पुष्टी मिळाली असून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत.
दरम्यान, याचा तपास करत असतानाच त्या जिलेटीनच्या कांड्या नसून फटाके असल्याचे समोर आले आहे. यामुळे पोलिसांसह मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र त्याचवेळी भाजपला धमकी देणारे एक पत्रही या फटाक्यांसोबत आढळले. त्यामुळे हे फटाके व पत्र कोणी गाडीत ठेवले याचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर आरपीएफ, जीआरपीएफची, बॉम्बशोधक पथके घटनास्थळी दाखल झाले होते.