दिवसभरात दोन ज्येष्ठांचा करोनाने मृत्यू
शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील धानोरे येथील 79 वर्षीय पुरुष तर सणसवाडीतील 80 वर्षीय करोनाबाधित महिलेचा उपचार दरम्यान मंगळवारी (दि. 4) मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
धानोरे येथे करोनाला अटकाव करण्यासाठी ग्रामस्थ व नागरिकांना चार महिन्यांपासून यश आलेले होते. अचानक करोनाचा शिरकाव होऊन येथील एका बड्या उद्योजकाला करोनाची बाधा झाल्याचे 26 जुलै रोजी समोर आले. आरोग्य विभागाच्या वतीने त्या उद्योजकाच्या घरातील 9 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह तर पाच जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये उद्योजकाचे वडील, भाऊ, भावजय व दोन लहान मुलांचा समावेश होता. या सर्वांवर पुणे येथे उपचार सुरु होते. त्यापैकी उद्योजकाच्या 79 वर्षीय वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सणसवाडी एका कंपनी कामगाराला करोनाची बाधा झाल्याचे 30 जुलै रोजी समोर आले होते.
आरोग्य विभागाने त्याच्या घरातील व्यक्तींची तपासणी केली असता, त्यांच्या घरातील दोन व्यक्तींचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर देखील वाघोली येथे उपचार सुरु होते. त्यातील 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या व्यक्तींच्या संपर्कातील नागरीकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.