करोनाच्या साथीमुळे फिल्म इंडस्ट्रीचे काम गेल्या 4-5 महिन्यांपासून बंदच होते. आता ते हळूहळू पुन्हा सुरू होते आहे. मात्र अजूनही थिएटर पूर्णपणे उघडलेले नाहीत आणि पूर्वी बंद झालेली सिनेमांच्या शूटिंगची कामेही अजून पूर्वीसारखी सुरू झालेली नाहीत.
आता शूटिंग करायचे म्हटले तर निर्मात्यांवर खर्चाचा अतिरिक्त ताण येतो आहे. तसेच इतके दिवस शूटिंग बंद राहिल्यामुळे सिनेमाच्या बजेटवरही परिणाम झाला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता शाहिद कपूरने एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. आपल्या “जर्सी’ या आगामी सिनेमाच्या मानधनात त्याने स्वतःहून कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिनेमा लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि रिलीज व्हावा यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. दीर्घकाळ शूटिंग बंद राहिल्यामुळे आता सिनेमाच्या बजेटवर जो अतिरिक्त ताण आला आहे, तो कमी करण्यासाठी कलाकार एकाच वेळी 2-2 शिफ्टमध्ये काम करून सिनेमा लवकर पूर्ण करण्यासाठी सहकार्य करत आहेत.
पण शाहिदने यापुढे जाऊन आपले मानधन कमी केले आहे. “जर्सी’साठी शाहिदला 33 कोटी रुपये आणि सिनेमाच्या नफ्यातील काही हिस्सा मिळणार होता. मात्र आता त्याने 25 कोटी रुपयातच काम करण्याचे मान्य केले आहे. पण प्रॉफिट शेअरबाबत काहीही बदल असणार नाही.