फॅमिली मॅनमुळे मनोज वाजपेयी पुन्हा चर्चेत आहे. तो सध्या फॅमिली मॅनचे यश एन्जॉय करतो आहे. मात्र, मनोजची चर्चा होत असताना त्याची पत्नी शबानाही चर्चेत आली आहे. तर शबानानेही एकेकाळी नायिका म्हणून बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. तिने तमिळ आणि कन्नड चित्रपटांतही काम केले आहे.
आता बॉलीवूडच्या प्रेक्षकांना खरेतर एकच शबाना म्हणजे आझमी माहीत आहेत. अन्य कोणी शबाना होती व तिने हृतिक, अजय देवगण आणि बॉबी यांच्यासोबत काम केले होते म्हटले की थोडा गोंधळ उडतो. तर ही मूळ शबानाच होती.
मात्र चित्रपटांसाठी तिचे नाव नेहा ठेवण्यात आले होते. करीब या चित्रपटाद्वारे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर ती होगी प्यार की जीतमध्ये अजय सोबत तर फिजामध्ये हृतिकसोबत झळकली होती. नंतर बऱ्याच काळाने ती संजय गुप्ताच्या अलीबागमध्ये दिसली होती.
नायक अथवा नायिकांची नावे बदलण्याची बॉलीवूडची खूप जुनी परंपरा आहे. ते त्यांच्या नव्या नावांनी प्रसिद्ध झाले की त्यांचे मूळ नाव कोणाला आठवत नाही, नेहा आता तशी चित्रपटांत फारशी नसते.
मात्र मनोजची पत्नी म्हणून जेव्हा तिला नावाबाबत विचारण्यात आले तेव्हा, आपण नवे होतो व आपल्यावर नाव बदलण्याचा दबाव होता. त्याला आपला विरोध होता, कारण आपल्या आई-वडिलांनी अत्यंत प्रेमाने शबाना नाव ठेवले होते. मात्र आपले नेहा असे नामकरण करण्यात आले.
त्यानंतर हेच नाव तिची ओळख बनले. पण ती आता पुन्हा तिला तिची खरी ओळख मिळवून दिल्याबद्दल संजय गुप्ताचे आभार मानते. अलीबागच्या वेळी आपण निर्माता दिग्दर्शक संजय गुप्ता यांना आपण आपल्या मूळ नावानेच काम करणार असल्याचे सांगितले. त्यांची हरकत नव्हती व आपल्याला आपली जुनी ओळख पुन्हा मिळाली असे तिने एका मुलाखतीत नमूद केले आहे.