पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिलेची तब्बल १७ लाख २९ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. बँक खात्यातून मनी लॉड्रिंग होत असल्याची भीती दाखवत तिच्या खात्यातून ऑनलाइन पद्धतीने हे पैसे धमकावून वर्ग करून घेण्यात आले. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंध येथील आनंद पार्क येथे रहाणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार एक स्काईप आयडीधारक आणि चार मोबाईल नंबरच्या वापरकर्त्यांविरुद्ध आयटी ॲक्टसह फसवणुकीची कलमे लावण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना सर्वप्रथम कीर्ती नावाच्या एका महिलेचा कॉल आला होता. तिने ट्रायकडून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या आधारकार्डवर एक मोबाईल नंबर देण्यात आला असून, त्यावरून अनेकांना बेकायदेशीर कॉल आणि त्रास देणे सुरू आहे. यासंदर्भात भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याचे सांगितले गेले.
दरम्यान, त्यानंतर एका मुंबई पोलीस नावाने असलेल्या एका स्काईप आयडीवरून भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप रॉय व सीबीआय ऑफीसर नवज्योत सीमी यांचा कॉल आला. त्यांनी तुमच्या अकाउंटवरून मनी लॉड्रिंग होत असल्याचे सांगत तुमचे बँक खाते सील केल्याचे सांगितले. तुमच्या आधार कार्डवरून मुंबईत हे बँक अकाऊंट खोलण्यात आले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना अटकेची धमकी देत मागील तीन महिन्यांत ऑनलाइन पद्धतीने तब्बल १७ लाख २९ हजार रुपये उकळण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे करत आहेत.
ऑनलाइन शूज खरेदीत पावणेदोन लाखाचा भुर्दंड
एका महिलेने अमेझॉनवरून एक शूज खरेदी केला होता. मात्र, त्याची डिलिव्हरी न मिळाल्याने तिने ऑनलाइन कस्टमर केअरचा नंबर शोधून कॉल केला. समोरच्या व्यक्तीने सांगितलेले ॲप डाऊनलोड करताच तिच्या खात्यातून तब्बल १ लाख ७४ हजाराची रक्कम वर्ग झाली. याप्रकरणी पर्वती येथील एका ४२ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तिच्या तक्रारीनुसार अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ऐनिडेस्क ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तिच्या बँक खात्यातून हे पैसे वर्ग झाले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.