पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील दुर्घटना
कोल्हापूर- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेळगावजवळ ट्रक आणि कारमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. महामार्गावर भरधाव निघालेल्या कारचा टायर फुटला. त्यामुळे कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावरून दुसऱ्या बाजूला रस्त्यावर गेली. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकची व कारची धडक होऊन कारमधील सात जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, औरंगाबादहुन कारमधून आठ जण बंगळूरला निघाले होते. कार श्रीनगर गार्डनजवळ आली तेव्हा समोरील टायर फुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजककावरून पलीकडील रस्त्यावर गेली. यावेळी धारवाडहून कोल्हापूरकडे निघालेल्या ट्रकला कारची जोरदार धडक बसली. धडक जबरदस्त असल्याने कारमधील सात जण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
नंदू पवार (28), अमोल नेवे (26), सुरेश कणेरी (29), अमोल चौरी (26), महेश चौरी (28) सर्वजण रा.औरंगाबाद अशी मृतांची नावे आहेत तर आणखी दोघेजण या अपघातात मृत्यू झाले असून त्यांची नावे कळू शकलेली नाहीत. या अपघातात एकूण सात जण ठार झाले आहेत. तर एकजण गंभीर जखमी झालेला आहे. त्यांच्यावर बेळगावातील के एल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते गोव्याकडे जात होते असताना हा अपघात घडला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त बीएस लोकेश कुमार, वाहतूक व गुन्हे विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगोडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव वाहतूक उत्तर विभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.