भविष्यात भाजप-शिवसेना एकत्र निवडणूक लढविणार – गिरीश बापट

श्रेय जनता देत असते हे विसरू नका

कोंढवा -लुल्लानगर उड्डाणपुलावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला माहीत आहे की, हा पूल कोणी उभा केला. उद्‌घाटन कुणीही करू द्यात श्रेय देण्याचे काम जनता करत असते. विश्‍वासाने विकासकामे करा लोक तुमच्या पाठीशी असतील. उद्या परवा मी माझ्या पालकमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे. पुणे शहराला वाहतूक कोंडीतून मुक्‍त करण्याचे आवाहन आम्ही स्वीकारले असून लवकरच शहर वाहतूक कोंडीमुक्‍त झाल्याचे आपल्याला दिसेल, असे मत नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्‍त केले.

कोंढवा खुर्द लुल्लानगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन पुणे महापालिकेच्या वतीने महापौर मुक्‍ता टिळक यांनी केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ना. बापट बोलत होते. शनिवारी शिवसेनेने उड्डाणपुलाचे उद्‌घाटन केले, तेव्हा भानगिरे कार्यक्रमास नव्हते. मात्र, भाजपने ठेवलेल्या उद्‌घाटनावेळी व्यासपीठावर नगरसेवक प्रमोद भानगिरे यांना पाहताच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. वाढदिवसानिमित्त बाळासाहेब कामठे यांचा सत्कार पालकमत्र्यांनी केला. या प्रसंगी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्‍ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, उपायुक्‍त श्रीनिवास बोनाला, सभाग्रह नेते श्रीनाथ भिमाले, अशोक कांबळे, प्रसन्न जगताप, सुभाष जंगले, अमर गव्हाणे, सत्पाल पारगे, ह.भ.प. पंढरीनाथ लोणकर, गणेश कामठे, अभिमन्यू भानगिरे, मदन शिंदे, नगरसेविका मनीषा कदम, राणी भोसले, वृक्षाली सुनील कामठे, नवनाथ लोणकर, राहुल टिळेकर, सुनील कामठे आदी उपस्थित होते.

आमदार टिळेकर म्हणाले, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर नसते तर, लुल्लानगरचा उड्डाणपूल झालाच नसता. पर्रीकरांमुळे पुलाला परवानगी मिळाली. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज मांजरी व सय्यदनगरच्या पुलाचे काम सुरू आहे.

राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, 2009 ला मित्रपक्षाने भूमिपूजन केले. मात्र, प्रत्यक्षात काम केले नाही. लुल्लानगर उड्डाणपुलाच्या कामाला पर्रिकरांनी परवानगी दिली. तुम्हाला उद्‌घाटन करायचे होते तर आज आला असता तरी चालले असते.

पाण्याची काळजी पुणेकरांनी करू नये
खासदार गिरीश बापट म्हणाले, पुणेकरांनी पाण्याची काळजी करू नये. भामा असखेडमधील 3 टीएमसी पाणी, टाटामधील 1 टीएमसी पाणी व शेतीसाठी 6 टीएमसी पाणी सायकलिंग करणार आहोत. पुणे शहरात मेट्रोचे जाळे करून, प्रत्येक प्रवासी हा आपल्या इच्छीतस्थळी अर्ध्या तासाच्या आत पोहोचेल याची काळजी घेतली जाईल. विरोधकांचा उल्लेख कधीच करू नका आपण काय करणार आहोत याची माहिती जनतेला द्या व ते काम विश्‍वासने पूर्ण करा. पुणे शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणार यात शंका नाही. लष्कराची जागा पुण्यात घेतली तरी लष्कराला जागा अहमदनगर येथे देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बापट यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कामठे यांनी केले; तर आभार राहुल टिळेकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.