लुधियाना – शॉर्ट सर्किटमुळे अचानक झोपडीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सात जण जिवंत जळाल्याची दु;खद घटना समोर आली आहे. ही घटना पंजाबमधील लुधियाना येथे घडली आहे. हे कुटुंब मक्कर कॉलनीत एका झोपडीत राहत होते. हसतं-खेळतं कुटुंब काही मिनिटांत उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने या कुटुंबातील एक जण मित्राच्या घरी झोपायला गेल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
अचानक आग लागल्यानंतर आरडाओरडा झाला. आग बघून स्थानिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला शिवाय अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या मात्र आग आटोक्यात येईपर्यंत कुटुंबातील सातही जण जिवंत जळाले होते. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब स्थलांतरित मजूर होते येथील टिब्बा रोडवरील नगरपालिकेच्या कचरा डंप यार्डजवळ त्यांच्या झोपडीत झोपले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा पोलीसांचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत कुटुंबातील सात सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पीडित दाम्पत्य आणि त्यांची पाच मुले अशी ओळख पटवली आहे. या कुटुंबातील राजेश कुमार मित्राच्या घरी झोपायला गेला होता. त्यामुळेच त्याचा जीव वाचला. असे राजेश याने सांगितले आहे. त्याचे वडील सुरेश कुमार भंगार विक्रेता म्हणून काम करायचे.