मंचर- अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शनिवार (दि. 25) पर्यंत सात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे. सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरपंच संगीता शिंदे यांनी दिला आहे. अवसरी खुर्द येथे आठवड्यापूर्वी एकही करोनाबाधित रुग्ण नव्हता; परंतु गेल्या पाच दिवसांत सुमारे सात रुग्ण बाधित आढळले आहेत, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गावात प्रशासनाने कंटेन्मेंट झोन जाहीर केला असून, नागरिकांनी बाहेरगावच्या नागरिकांना गावात बोलावू नये किंवा आपणही बाहेर जाऊ नये, असे आवाहन अवसरी खुर्द येथील आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अवसरी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने गावात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. गावातील कचरा सांडपाण्याची व्यवस्था करून गावात स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य विकास भोर आणि ग्रामविकास अधिकारी आर. टी. गाढवे यांनी दिली.