शिक्रापूर परिसरात आढळले 8 रुग्ण
शिक्रापूर- शिक्रापूर परिसरात दररोज विविध ठिकाणी करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी (दि. 25) शिक्रापुरात 4, कोरेगाव भीमात 2, तसेच दरेकरवाडी व धानोरे येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. धानोरे येथील एका बड्या उद्योजकाला देखील करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली.
शिक्रापूर येथे चार करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी तिघे कंपनी कामगार आहेत. कोरेगाव भीमा येथील दोघांना करोनाची बाधा झाली आहे. दरेकरवाडी व धानोरे या दोन्ही गावांमध्ये प्रथमच कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
या परिसरातील करोनाबाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्यसेविका जनाबाई शिरसाठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून औषध फवारणी केली. शिक्रापूर येथील चौघांच्या संपर्कातील 14 जणांना तर कोरेगाव भीमा येथील दोघांच्या संपर्कातील नऊ जणांना तसेच धानोरे येथील करोनाबाधित महिलेच्या संपर्कातील चार जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.