नाशिक : नाशिकच्या शिरवाडे वणी फाट्याच्या चौफळीवर भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे. ओम्नी कार आणि एर्टिगाच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन वर्षीय बालकाचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताविषयी माहिती देताना पोलिसांनी, “रविवारी रात्री मोहन पगार हे नातलगांसह ओम्नी कारमधून नाशिकहून चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथे जात होते. रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ओमनी वाहन शिरवाडे वणी चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना वडनेरभैरव कडे वळत असताना पाठीमागून येणाऱ्या एर्टीगा कारने ओमनीला जोरदार धडक दिली.
या धडकेत ओमनी कार च्या डाव्या बाजूचा चक्काचुर होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात इर्टीगा कारमधील भुसावळ येथील भूषण विठ्ठल धोटे यांच्यासह ओमनी कारमधील देवा सुमित पगार या तीन वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान दोन्ही वाहनातील मोहन शंकर पगार, मीना मोहन पगार, सुमित मोहन पगार, कैलास शंकर बराटे, स्वप्निल भगवान चौधरी, मयुरेश सुरेश बराटे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरवाडे फाटा चौफुलीवर अपघात झाल्याची माहिती मिळताच शिरवाडे फाटा स्पाॅटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लागलीच अपघात स्थळी पोहोचली. यानंतर तातडीने रुग्णांना पिंपळगावला उपचारासाठी हलविण्यात आले.