दिल्ली – शिवसेनेला सध्या बंडाळीने ग्रासले आहे. 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर काही आजी-माजी नगरसेवकांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्यात आला आहे. केंद्रातील भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील 12 खासदारांनी भेट घेत शिंदे गटाला समर्थन दिले आहे.
आता या खासदारांकडून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची त्यांच्या दालनात भेट घेतली आहे. तसेच, स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबत पत्र देत चर्चा केली. दरम्यान, लोकसभा सचिवालयाने खासदारांच्या पत्रात काही बदल सुचवले आहेत. शिंदे गटाने पत्र मुख्य प्रतोदांच्या नावाने द्यावे, असा बदल सुचवला आहे.
दरम्यान, शिंदे गटाने खासदार राहूल शेवाळे यांना लोकसभेतील गटनेता नेमण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. शिवसेनेच्या प्रतोद खासदार भावना गवळी या मुख्य प्रतोद पदावर कायम असल्याचे शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालयाच्या सुचनेनुसार पत्रात बदल करून ते मुख्य प्रतोद खासदार गवळी यांच्या नावे आणि बारा खासदारांच्या सहीनंतर सादर करण्यात येणार आहे.
वेगळ्या गटाची मागणी करणारे खासदार
श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
मातोश्रीशी एकनिष्ठ खासदार
खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडु जाधव, ओमराजे निंबाळकर हे सहा खासदार तूर्तास मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत.