पुणे – एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षामध्ये उभी-आडवी फूट पडली आहे. आमदारांनंतर राज्यभरातील सेनेचे नगरसेवक, पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने शिंदे गटात सामील होताना दिसतायेत. अशातच आता उद्धव ठाकरे यांना पुण्यातून मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्यातील दोन जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आणि शरद सोनवणे हे शिंदे गटात सामील झाले आहेत.
विकास महत्त्वाचा असे म्हणत पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख रमेश कोंडे यांनी काल एकनाथ शिंदे गटाची वाट धरली होती. पुण्यातून शिवसैनिकांची फारशी पडझड होणार नाही असे वाटत असतानाच कोंडे यांनी शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतल्याने पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
रमेश कोंडे म्हणतात…
रमेश कोंडे यांच्याशी प्रभात प्रतिनिधींनी संपर्क साधला असता त्यांनी, ‘माझ्यासोबत जी लोक आहेत त्यांचे काम होणे गरजेचे आहे. आम्ही आजही सेनेचे शिलेदार आहोत परंतु गेल्या सरकारने आमची कामे केली नाहीत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात शिवसेनेचा कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांची घुसमट झाली. आमच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुद्धा विकास कामे झाली नाहीत. एकनाथ शिंदे यांनी विकास आणि हिंदुत्व या मुद्द्यावर सरकार उभे केले आहे. आणि महाराष्ट्रातील जनतेच्या विकासाला त्यांच्या निर्णयामुळे चालना मिळेल असा विश्वास आम्हाला आहे.’ अशी भूमिका मांडली.
रमेश कोंडे यांच्या निर्णयामुळे ग्रामीण भागात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे