डेहराडून -उत्तराखंडमधील भाजपचे ज्येष्ठ नेते भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडले. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने त्यांनी ते पाऊल उचलले. घटनात्मक पदाची जबाबदारी आल्याने कोश्यारी यांनी उत्तराखंड भाजपचे अध्यक्ष अजय भट्ट यांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्य म्हणून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान अशी ओळख असणाऱ्या कोश्यारी यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनीय ठरली. ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही त्यांनी काही काळासाठी सांभाळली.