बेंगळुरू – “चांद्रयान-3’च्या यशानंतर “आदित्य एल-1’ने सुर्याच्या दिशेने झेप घेत इस्रोने देशाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला. आदित्य एल-1चा सुर्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला असून प्रवासाचे फोटो आणि व्हिडीओ इस्रोकडून ट्विटर हॅंडलवरुन शेअर केले जात आहे. अशातच इस्रोने आणखी एक ट्वीट केले आहे.
या ट्वीटमध्ये आदित्य एल1ने काढलेला सेल्फी ट्वीट केला आहे. आदित्य एल1 सूर्याच्या दिशेने म्हणजेच, एल 1 पॉईंटकडे आपला प्रवास करत आहे. दरम्यान, सूर्य, पृथ्वी एल-1 पॉईंटसाठी जाणाऱ्या आदित्य एल-1 ने पृथ्वी आणि चंद्राचे सेल्फी आणि काही फोटो काढले आहेत.
इस्रोने दुसऱ्यांदा आदित्य एल-1 ची कक्षा वाढवली आहे. आता आदित्य एल-1 पृथ्वीपासून 40 हजार 225 किलोमीटवर पोहोचले आहे. 10 सप्टेंबरला तिसरा थ्रस्टर फायर करून आदित्य एल-1 च्या कक्षेत तिसऱ्यांदा वाढ केली जाणार आहे.
इस्रोचे आदित्य एल-1 दोन सप्टेंबर रोजी सूर्याकडे झेपावले. त्यानंतर 24 तासांतच आदित्य एल-1ची कक्षा पहिल्यांदा वाढवण्यात आली. त्यानंतर आज पहाटे पावणेतीन वाजता पुन्हा एकदा कक्षा वाढण्यात आली आहे. आदित्य एल-1 एकूण 16 दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहणार असून पाचवेळी थ्रस्टर फायर करून कक्षा वाढवणार आहे.
दरम्यान, आदित्य एल-1 हे सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान एल।1 बिंदूपर्यंत जाणार आहे. प्रक्षेपणानंतर ते पोहोचण्यासाठी 125 दिवस लागतील. त्यानंतरच आदित्य एल1 सूर्यावर संशोधन सुरू करू शकेल. त्याचबरोबर चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोहोचल्यानंतर दीर्घ संशोधन करावे लागेल.
यासोबतच इस्रो आणखी अनेक मोहिमा सुरू करणार आहे. ज्यामध्ये शुक्र आणि गगनयान मोहिमा पाईपलाईनमध्ये आहेत. शुक्र हा अंतराळातील एकमेव ग्रह आहे जो जवळजवळ पृथ्वीसारखा आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.