कोपरगाव (प्रतिनिधी) – संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टीअँड पी) विभागाच्या नियोजनानुसार डिझाईन व मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रातील दिपेश इंजिनिअरिंग या आघाडीच्या कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील तीन अभियंत्यांची आकर्षक पगारावर त्यांच्या अंतिम निकालाअगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे. टी अँड पी विभागाच्या वर्षभराच्या नियोजनानुसार एकापाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या नवोदित अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करीत आहे.
दिपेश इंजिनिअरिंग कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये सार्थक दत्तात्रय आभाळे, मोईझ पाशु शेख व प्रसाद गजानन नर्सिकर यांचा समावेश आहे. मागीलवर्षी टी अँड पी विभागाच्या प्रयत्नाने सुमारे ७७० नवोदित अभियंत्यांना वार्षिक पॅकेज २० लाखापर्यंच्या नोकऱ्या देण्यात आल्या होत्या.
चालूवर्षीही या विभागाची यशस्वी घौडदौड चालू असून, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे नामांकित कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात असल्यामुळे संजीवनीचे नवोदित अभियंते कंपन्यांच्या कसोटीत उतरत असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी निवड झालेल्या अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी छाटेखानी कार्यक्रमात तिघांचा सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, टी अँड पीचे डीन डॉ. विशाल तिडके, विभागप्रमुख डॉ. प्रसाद पटारे , समन्वयक प्रा.अतुल जोशी उपस्थित होते.
मी छत्रपती संभाजीनगरचा रहिवासी असून, मला तेथील एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहज प्रवेश मिळाला असता. परंतु संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज हे नोकरी मिळवून देण्यात व त्यादृष्टीने तयारी करून घेण्यात आघाडीवरअसते, हे मी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे ऐकले होते, पाहिले होते. म्हणून मी संजीवनीमध्येच प्रवेश घेतला.
येथे पहिल्या वर्षापासूनच संभाषण कौशल्य, देहबोली, हजरजबाबीपणा इत्यादी बाबींचे प्रशिक्षण दिलेच जाते. परंतु, शेवटच्या वर्षात असताना टीअँडपी विभागाने कंपनीच्या गरजेनुसार आमची तयारी करून घेतली. कंपनीच्या मुलाखतीच्या अगोदर आमच्या मुलाखती घेतल्या. यामुळे दिपेश इंजिनिअरींग कंपनीच्या कसोटीत मी सहज उत्तीर्ण झालो. चार वर्षांपूर्वी ज्या विश्वासाने मी संजीवनीमध्ये दाखल झालो होतो, ते माझे स्वप्न संजीवनीने पूर्ण केले. -नवोदित अभियंता प्रसाद नर्सिकर