नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात पाकिस्तानमधून आपल्या प्रेमासाठी आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणाने चर्चा रंगली आहे. मात्र सुरुवातीला प्रेमासाठी देश सोडून आलेल्या सीमाविषयी सर्वाना कुतूहल वाटले परंतु आता सीमाचे पाकिस्तानी सैन्य आणि तिथल्या गुप्तहेर संघटनांशी संबंध असल्याचा संशय बळावत चालला आहे. अशात आता सीमा आणि सचिनच्या लग्नाचे फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ग्रेटर नोएडा येथील सचिन आणि सीमा हैदर यांच्या लग्नाशी संबंधित छायाचित्रे समोर आली आहेत. फोटोंमध्ये सीमा हैदर आणि सचिन एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. एका छायाचित्रात सीमा हैदर सचिन मीनाच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे.
पशुपती नाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा
सीमा 13 मे रोजी दुबईमार्गे पाकिस्तानातून दुसऱ्यांदा नेपाळला पोहोचली. यानंतर ती नेपाळहून बसने ग्रेटर नोएडा येथे आली. यापूर्वी मार्चमध्ये सीमा हैदर आणि सचिन नेपाळमध्ये भेटले होते. पाकिस्तानी महिला सीमा हैदरने चौकशीदरम्यान सांगितले होते की, तिने नेपाळमधील पशुपती नाथ मंदिरात सचिनसोबत लग्न केले होते.
राष्ट्रपतींना नागरिकत्वासाठी आवाहन केले
सीमा हैदरने वकिलामार्फत राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल केला आहे. याद्वारे सीमा हैदरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल करत भारतीय नागरिकत्वाची विनंती केली आहे. सीमाचे वकील डॉ.ए.पी. सिंग यांच्या म्हणण्यानुसार, तिने नेपाळमधील ग्रेटर नोएडा येथील सचिन मीनाशी लग्न केले, त्यामुळे आता ती भारताची सून आहे. याच आधारावर सीमाला भारतीय नागरिकत्व हवे आहे.