अयोध्या – अयोध्या येथे जे नियोजित राम मंदिर उभारले जात आहे ते प्रभु रामचंद्रांचे जन्मठिकाण असल्याचे सांगितले जाते. त्या ठिकाणी रामाची धनुर्धारी स्वरूपाची काळ्या पाषणातील मुर्ती बसवण्याचा निर्णय मंदिराच्या ट्रस्टने निश्चीत केला आहे. ही मुर्ती पाच फुटाची असणार असून ती अर्जून योगीराज या कलाकाराकडून तयार केली जात आहे. त्याचे काम म्हैसूर येथे सुरू आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांची बैठक काल रात्री उशिरा संपली. त्यात मुर्तीच्या रचनेविषयीचे अंतिम निर्णय घेण्यात आले आहेत. ही मुर्ती राम पाच वर्षाच्या असतानाच्या स्वरूपातील असणार आहे. ती उभी असून हातात धनुष्य आणि बाण असणार आहे असे ट्रस्टचे एक पदाधिकारी स्वामी तीर्थ प्रसन्नाचार्य यांनी म्हटले आहे.
या मुर्तीसाठीचा पाषाण कर्नाटकातील करकार आणि हेग्गे देवेन कोटे येथून आणण्यात आला आहे. त्यातील एका पाषाणातून ही मुर्ती कोरली जाणार आहे. यातील नेमका कोणता पाषाण मुर्तीसाठी वापरायचा याचा निर्णय मुतीकारावरच सोपवण्यात आला आहे. अनेक तज्ज्ञांशी आणि हिंदु धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून या शिळा निश्चीत करण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी मकरसंक्रातीच्या दिवशी मंदिरातील गाभाऱ्यात या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. अयोध्येत रामाचे हे भव्य मंदिर 2.77 एकर जागेवर उभारले जात असून त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.