जम्मू – इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. केंद्रीय एजन्सीच्या माहितीनुसार, पाकिस्तानातील सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, हमासने ज्याप्रकारे इस्रायलवर अचानक हल्ला केला, त्याचप्रकारच्या युक्त्या वापरून पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करू शकतात.
असे असले तरी, दोन्ही ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीत साम्य नाही. जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येक कोपऱ्यात सुरक्षा दल तैनात आहेत. ग्लायडरमध्ये बसून किंवा तत्सम इतर कोणत्याही तंत्राने दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करू शकत नाहीत. तरिही सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. त्याचे कारण म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर तैनात दहशतवादी हमासच्या हल्ल्याचे तपशील एक नवीन कल्पना म्हणून अभ्यासत आहेत.
कोणत्या यंत्रणा हाय अलर्टवर?
1. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी
2. इन्फोर्मेशन ब्युरो अर्थात आयबी
3. रिसर्च अँड ऍनालिसिस विंग अर्थात “रॉ’
4. जम्मू-काश्मीर पोलिसांची इंटेलिजन्स युनिट
5. केंद्रीय दलांची गुप्तचर युनिट्स
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये कोणत्याही मोठ्या प्रदर्शनाला परवानगी देण्यात आलेली नाही. जरी पाकिस्तानी गुप्तचर युनिट आयएसआयने खोऱ्यात आपले स्लीपर सेल/ओव्हर ग्राउंड/अंडर ग्राउंड वर्कर सक्रिय केले होते, परंतु भारतीय सुरक्षा एजन्सींच्या सतत पाळत ठेवल्यामुळे ते त्यांच्या हेतूत यशस्वी होऊ शकले नाहीत. तेथे कोणतीही मोठी हालचाल दिसत नसली तरी हमासच्या समर्थनात अंडरकरंट दिसून येत आहे.
हमास आणि जम्मू-काश्मीरची चर्चा
गुप्तचर यंत्रणांना असे इनपुट मिळाले आहेत की पाकिस्तानच्या सोशल मीडियावर जम्मू-काश्मीरसंदर्भातल्या संदेशांमध्ये हमास आणि जम्मू-काश्मीरची चर्चा आहे. हमासने ज्या प्रकारे इस्रायलवर हल्ला केला आहे, तसेच धाडस जम्मू-काश्मीरमध्येही केले जाऊ शकते. दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी एखाद्या भागात होऊ शकते. हमासने इस्रायलमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरलेले हेच तंत्र जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरले जाऊ शकते.
त्यामुळेच जम्मू-काश्मीरमध्ये संपूर्ण दक्षता ठेवण्यात आली आहे. इस्रायल आणि जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीमध्ये खूप फरक आहे. भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणे पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी सोपे नाही. हमासची युक्ती इथे चालणार नाही. तरिही भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर काम करत आहेत.
हमासला पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण?
यापूर्वी जून 2021 मध्ये माजी पाकिस्तानी मुत्सद्दी आणि ज्येष्ठ खासदार रझा जफर उल हक यांनी जाहीरपणे कबूल केले होते की, पाकिस्तानी लष्कराने गाझा पट्टीमध्ये हमासच्या सैनिकांना लष्करी प्रशिक्षण दिले आहे. हमाससाठी हे प्रशिक्षण व्यासपीठ दीर्घकाळापासून कार्यरत आहे. पाकिस्तानी लष्कराने आपल्या विशेष कमांडो युनिटची एक बटालियन गाझामध्ये पाठवल्याचेही उघड झाले आहे.
रझा जफर उल हक ट्युनिशियाला गेले होते, तेव्हा अबू जिहाद (खालिद अल वजीर) तिथे जिवंत होता. या अबू जिहादने रझा जफरला सांगितले होते की, हमास जेव्हा-जेव्हा इस्रायलशी लढतो तेव्हा सर्वात जास्त लढाऊ सैनिक हे पाकिस्तानकडून लष्करी प्रशिक्षण घेतलेले असतात. ते प्रशिक्षण नियमितपणे सुरू असते. गाझामध्ये सक्रिय असलेल्या फतह पक्षाच्या सह-संस्थापकांमध्ये अबू जिहादचाही समावेश होता.