पुणे – प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव लिखित झुळूक आणि स्पंदन या कवितासंग्रहाचे प्रकाशन मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथील लता मंगेशकर सभागृहात पार पडले. याआधी डॉ. झुंजारराव यांचे ‘फुलोरा’, ‘ओंजळ’ ‘गुंफण’ व ‘बहर’ हे चार कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर जाधव व कवयित्री प्रा. डॉ. हेमा लेले हे ‘झुळूक’ व ‘स्पंदन’ या दोन संग्रहाच्या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कविता ही जगण्यातील चिंतनशीलतेचा आविष्कार आहे. झुळूक या संग्रहातील कविता माणसाला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी प्रवृत्त करते. संवादहीन होत चाललेल्या समाजाला ही कविता एकत्र जोडू पाहते असे मत डॉ.मनोहर जाधव यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील प्राचार्यांच्या लेखनाची परंपरा खूप मोठी आहे. या परंपरेला डॉ. राजेंद्र झुंजार राव यांनी पुढे नेले आहे ही अभिमानास्पद बाब आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी मॉडर्न महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध कवयित्री हेमा लेले या सुध्दा मंचावर उपस्थित होत्या.
स्पंदन या संग्रहातील कविता ही सुरांशी जवळीक साधणारी आहे. ही कविता वाचताना वसंत बापट यांच्या कवितेशी ती नाळ जोडू पाहते आहे हे लक्षात येते. मंचीय कवितेसाठी अशा स्वरूपाच्या कविता लेखनाची गरज असते. आजकाल गद्य स्वरुपाकडे कविता अधिक झुकली आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. राजेंद्र झुंजारराव यांची कविता ही एका उत्कृष्ठ प्रशासकाच्या संवेदनशील मनाची अभिव्यक्ती आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. शामकांत देशमुख यांनी व्यक्त केले. या कविता हा जगण्याचा एक भाग असल्याचे मनोगत यावेळी कवी डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी व्यक्त केले.
यावेळी झुळूक या संग्रहाचे साहित्यविश्व प्रकाशनाचे विक्रम शिंदे, स्पंदन हा कवितासंग्रह प्रकाशित करणाऱ्या अभिरुची पब्लिकेशन्सच्या वैजयंतीमाला भोसले कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या प्रकाशन सोहळ्याला मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी, माजी प्राध्यापक वर्ग, काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ललित कला विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी कवी डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्या कविता सूरबद्ध करून सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अंजली सरदेसाई यांनी केले.