मुंबई – शेअर बाजार, डिपॉझिटरी, क्लिअरिंग कार्पोरेशन इत्यादीनी गुंतवणूकदारांच्या तक्रारीची दखल घेऊन या तक्रारीचा निपटारा करावा. त्याचबरोबर या संदर्भातील कार्य अहवाल आपल्या वेबसाइटवर जाहीर करावा अशा सूचना बाजार नियंत्रक सबीने जारी केल्या आहेत.
संबंधित महिन्यातील तक्रारीबाबत काय कार्यवाही केली याचा अहवाल पुढील महिन्याच्या 7 तारखेअगोदर आपल्या वेबसाईटवर टाकावा अशी सूचना सेबीने एका परिपत्रकाच्या माध्यमातून केली आहे. त्याचबरोबर ही माहिती कशा पद्धतीने दाखल करावी याचा नमुना सेबीने शेअर बाजारांना आणि इतरांना दिला आहे.
अगोदरच्या महिन्यातील किती तक्रारी होत्या. चालू महिन्यात किती तक्रारी आल्या. यातील किती तक्रारीचा निपटारा झाला. किती तक्रारीचा निपटारा कोणत्या कारणामुळे झाला नाही याची माहिती वेबसाईटवर येणे अपेक्षित आहे. 1 जानेवारी 2022 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
गुंतवणूकदारांसाठी गेल्या महिन्यात आचारसंहिता जारी केल्यानंतर आता सेबीने तक्रार निवारणाच्या अंमलबजावणीबाबत पुढाकार घेतला आहे. आचारसंहितेमध्ये गुंतवणूकदारांनी काय करावे आणि काय करू नये याचा तपशील देण्यात आला आहे. भारतामध्ये डिमॅट खात्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे या गुंतवणुकदारांची फसवणूक होण्याच्या शक्यताही वाढल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांचे हितसंरक्षण पाहावे, त्यांना पारदर्शक पद्धतीने व्यवहार करता यावे यासाठी सेबी पुढाकार घेत आहे.