अनधिकृत सोनोग्राफी सेंटरला सील

महापालिकेजवळ असून प्रशासानाचे नव्हते लक्ष : केंद्रीय तपास पथकाची कारवाई

पुणे – महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेले आणि बेकायदेशीररित्या सुरू असलेले सोनोग्राफी सेंटर थेट केंद्रीय तपास पथकाने येऊन सील केले. महापालिका भवनाजवळच हे बेकायदेशीर कृत्य होत असताना महापालिका प्रशासनालाच याची माहिती नसल्याबद्दल पथकाने नाराजी व्यक्त केली.

गर्भलिंगनिदान संदर्भातील तपासणी करण्यासाठी केंद्रातील “नॅशनल इन्स्पेक्‍शन ऍन्ड मॉनिटरींग कमिटी’चे (एनआयएमसी) पथक शुक्रवारी पुण्यात आले होते. त्या पथकाने शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनीमध्ये थेट कारवाई करत बेकायदेशीर रित्या चालवल्या जाणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर कारवाई करत एक मशीन सील केले. महापालिकेपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर केंद्रीय समितीने कारवाई केली परंतु महापालिकेला असे कृत्य होत असल्याबाबत माहितीही असू नये याबाबत या पथकाने नाराजी व्यक्त केली आहे.

या पथकात “एनआयएमसी’च्या पाच जणांचा समावेश होता. त्यांनी पुण्यातील विविध सोनोग्राफी सेंटर्समध्ये जाऊन त्यांनी अचानक तपासणीला सुरूवात केली. या पथकामध्ये लखनौ, अहमदाबाद, त्रिची, दिल्ली आणि राजस्थानातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. लखनौच्या निलम सिंग या पथकाचे नेतृत्त्व करत होत्या. तपासणीदरम्यान मॉडेल कॉलनीमधील एका रुग्णालयात त्यांना आक्षेपार्ह पद्धतीने सोनोग्राफी होत असल्याचे निदर्शनास आले. “फॉर्म एफ’मधील त्रुटी आणि सोनोग्राफीबाबत संशयास्पद हालचाली दिसल्याने त्यांनी हे मशीन सील केले. या रुग्णालयावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिकेला दिल्या आहेत.

“एनआयएमसी’ची समिती यापूर्वी 2015 मध्ये पुण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी रुग्णालयांची अचानक तपासणी केली होती. परंतु, त्यावेळी त्यांना एकाही सेंटरवर बेकायदा कृत्य सुरू असल्याचे आढळून आले नाही. परंतु यावेळी मात्र महापालिका भवनाजवळच असा प्रकार होत असल्याचे दिसून आले. समितीने महापालिकेला दिलेल्या सूचनांशिवाय गर्भलिंग निदान विषयक प्रलंबित खटल्यांबाबत योग्य ती कार्यवाही विधी विभागामार्फत करण्याच्या सूचनाही या समितीने केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.