पालिका आयुक्त : कंटेन्मेंट झोनचा दर आठवड्याने आढावा
पुणे – एका इमारतीतच नव्हे, तर ज्या भागात-कॉलनीत कमीतकमी पाच रुग्ण सापडतील, तो भाग लगेचच कंटेन्मेंट म्हणून सील करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी याविषयी माहिती दिली.
आपल्याकडे एप्रिल आणि मे महिन्यात कंटेन्मेंट झोन केले तेव्हा तो साधारण नऊ टक्के भाग त्यात होता. परंतु त्याच्या बाहेरही 18 ते 20 टक्के लोक बाधित सापडत होते. परंतु जेव्हा लॉकडाऊन शिथिल करून शहरातील कामकाज सुरू केले तेव्हा असे लक्षात आले की, 30 टक्के पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात 49 टक्क्यांपर्यंत लोक कंटेन्मेंटच्या बाहेर बाधित सापडले. शहरातील कामकाज सुरळीत करताना असे होणे साहजिक आहे, असे आयुक्त म्हणाले.
आता कंटेन्मेंट जाहीर करताना पंधरा दिवसाची वाट न बघता दर आठवड्याला आपण कंटेन्मेंट झोनचा आढावा घेऊ. जो भाग नव्याने लक्षात येतोय, तो कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट करू. ज्या मिनिटाला तो कंटेन्मेंटमध्ये येईल, त्यावेळी तेवढी लोकसंख्या कंटेन्मेंटमध्ये आली असा त्याचा अर्थ आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
आणखी बाधितांच्या लाटा येतील असे म्हटले जात आहे. त्याला तोंड द्यायचे असेल तर प्रत्येक कंटेन्मेंट भागाचा आढावा सातत्याने घ्यायला पाहिजे. नव्याने एरिया आला, कॉलनी आली, इमारत आली आणि त्यात पाच पेक्षा जास्त बाधित असतील तर त्यांना कंटेन्मेंटमध्ये टाकणे हा त्यावर उपाय आहे. असे करत करतच आपल्याला त्याचा सामना करायचा आहे, असे आयुक्तांनी यावेळी बोलताना नमूद केले.