बारामती -धनगर समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या “त्या’ तिघांवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर आरोपी यांनी धनगर समाजाबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सकल धनगर समाजाने केली. समाजाचे कार्यकर्ते अभिजीत देवकाते, पांडुरंग कचरे, अमोल सातकर, निलेश धालपे, संपतराव टकले, मेघराज नालंदे, सूरज चोपडे आदींनी याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले.
मात्र पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्याकडे दुसऱ्या दिवशी केली. त्याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन धरले. अखेर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.
आरोपी यांनी त्यांच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवर धनगर जातीबद्दल आक्षेपार्ह कमेंट करून सामाजिक भावना दुखवून समाजामध्ये तेढ निर्माण केली. त्यामुळे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.