नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड शनिवारी 3 जून रोजी विवाह बंधनात अडकला. चेन्नई सुपर किंग्जसाठी यंदाचे आयपीएल शानदार खेळणाऱ्या ऋतुराजने उत्कर्षा पवारसोबत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ऋतुराजची पत्नी उत्कर्षा देखील क्रिकेटर आहे. ऋतुराजने विवाह सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ऋतुराजने लग्नासाठी टीम इंडियातून रजा घेतली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली होती, परंतु त्याने आपले नाव मागे घेतले. ऋतुराजच्या जागी यशस्वी जैस्वाल टीम इंडियामध्ये सामील झाली.आयपीएल फायनलनंतर ऋतुराज आणि उत्कर्षा एकत्र दिसले होते. ऋतुराज आणि उत्कर्षा यांचा विवाह सोहळा महाबळेश्वरमध्ये संपन्न झाला.
View this post on Instagram
ऋतुराजने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांना हार घालताना दिसत आहेत. यावेळी दोघेही खूप आनंदी असल्याचे समजते. दोघांनी एकमेकांसोबत विविध पोज देत यावेळी फोटो काढले आहेत. सध्या सोशल मीडियावर या दोघाचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. या फोटोंवर अनेकांनी दोघांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विशेष म्हणजे, मराठमोळी अभिनेत्री सायली संजवनेही या नवविवाहित दांपत्याचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सालीची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. गेले अनेक महिने सायली संजीवचं नाव ऋतुराज गायकवाडशी जोडलं जात होतं. ते दोघे डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण सायलीने अनेकदा यावर भाष्य करत त्या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.
कोण आहे? उत्कर्षा पवार
उत्कर्षा पवारचा जन्म 13 ऑक्टोबर 1998 रोजी झाला. ती एक क्रिकेटरही आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ती महाराष्ट्राकडून खेळायची. उत्कर्षा ही अष्टपैलू खेळाडू आहे. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि गोलंदाजी करते. ती 18 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र संघाकडून शेवटचा सामना खेळली होता. समोर आलेल्या माहितीनुसार उत्कर्षा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (पुणे) येथून शिक्षण घेत आहे.