पुणे (प्रभात वृत्तसेवा) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण पद्धतीने सुरू होत असलेल्या एमबीए अभ्यासक्रमास प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया दि. 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यास दि. 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.
विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा अंतर्गत दूरस्थ शिक्षण पद्धतीने एमबीएची प्रवेशप्रक्रिया होत आहे. एमबीए प्रथम वर्ष प्रवेशासाठी किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यानंतर दोन वर्षाचा कामाचा अथवा व्यवसायाचा अनुभव असणारे प्रवेशासाठी पात्र राहतील.
हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून, चार सेमिस्टर असतील, अशी माहिती मुक्त अध्ययन प्रशाळेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी दिली.
दूरस्थ शिक्षणाच्या एमबीए अभ्यासक्रमात ह्युमन रिसोर्स, मार्केटिंग, फायनान्सियल, इंटर्नप्रिनेअरशिप, प्रोजेक्ट, इंटरनॅशनल बिझनेस, सप्लाय चैन मॅनेजमेंट ही प्रमुख विषयाचा अंतर्भाव असणार आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची माहिती विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळेच्या http://unipune.ac.in/sol/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
त्याच संकेतस्थळावरून एमबीए प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, असेही डॉ. जाधव यांनी म्हटले आहे.