पेठ – सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागातील सातही गावांना परांडा घोडनदी पात्रातून बंद पाइपलाइनद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी 22 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांनी दिली.
देविदास दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना यांची बैठक पेठ (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे घेण्यात आली. त्यामध्ये पाणीपुरवठा समितीची स्थापना स्थापन करून अध्यक्षपदी राम तोडकर, उपाध्यक्षपदी विशाल तोत्रे, सचिवपदी ग्रामविकास अधिकारी एम. जे. चौगुले, सहसचिवपदी ग्रामसेवक अनिल टेमकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी या योजनेच्या पुढील कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली.या योजनेसाठी कुरवंडी येथे पाणी आणून, नंतर संपूर्ण सातगाव पठार भागातील गावांना समान दाबाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. एकूण 22 कोटींची ही योजना असून, या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वापरकर्त्यासाठी नळ पाणीपुरवठा मीटर बसवला जाणार आहे.
कुरवंडी येथे आवश्यक असणारी 20 गुंठे जागा माजी सरपंच विशाल तोत्रे यांनी दिली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य शीतल तोडकर, श्री वाकेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम तोडकर, अशोक बाजारे, सचिन पानसरे, माजी उपसरपंच संतोष धुमाळ, महेश नवले, जितेंद्र तोत्रे, विकास बारवे, अशोक राक्षे, विनायक धुमाळ, अनिल सणस, दिलीप धुमाळ, रवींद्र तोत्रे, सखाराम तोत्रे,दतात्रय तोत्रे, दिलिप पवळे, प्रशासक अधिकारी सागर कांबळे, तलाठी हेमंत भागवत, एम. जे. चौगुले, अनिल टेमकर,आर. व्ही. घोडेकर, एस. बी. वाळूंज उपस्थित होते.