शिरोबाच्या डोंगरावरील घटना; शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सकडून बचावकार्य
सातारा – मधमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे जीव वाचवण्यासाठी पळताना तीनशे फूट खोल कड्यावरून कोसळून सोमेश्वर विलास कदम (वय 13, रा. तारळे, ता. पाटण) याचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी 11 च्या सुमारास शेरेवाडी, ता. सातारा येथे शिरोबाच्या डोंगरावर घडली.
याबाबत माहिती अशी, सोमेश्वर कदम हा काही दिवसांपूर्वी शेरेवाडी, ता. सातारा येथे मामाकडे सोमेश्वर काही दिवसांपूर्वी आला होता. तो रविवारी सकाळी मामासोबत शिरोबाच्या डोंगरावर गेला होता. त्यावेळी मधमाशांचे पोळे अचानक उठले. मधमाशांनी मामा व सोमेश्वरवर अचानक हल्ला केला.
जीव वाचवण्याच्या आकांताने मामा आणि भाचा इकडेतिकडे पळू लागले. त्यावेळी डोंगराच्या कड्यावरून पाय घसरल्याने सोमेश्वर तब्बल तीनशे फूट कड्यावरून खाली कोसळला. ही घटना समजल्यावर गावातील काही लोकांनी डोंगरावर धाव घेतली; कडा खोल असल्याने त्यांना खाली उतरता आले नाही.
त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार, देवेंद्र गुरव, आदित्य पवार, सिद्धार्थ गायकवाड व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी दरीत उतरून सोमेश्वरचा मृतदेह बाहेर काढला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. मधमाशांच्या हल्लामध्ये सोमेश्वरचा मामाही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.