वाई – विद्यार्थ्यांच्या जीवनात शाळेची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्व विकासात शाळा हा केंद्रबिंदू असते. शाळेचे पर्यावरण हे मुलांना आयुष्यभर प्रेरक ठरते; म्हणून ते जपायला हवे, असे प्रतिपादन अभिनेते संजय खापरे यांनी केले.
येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमेश गरवारे स्कूलचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संजय खापरे बोलत होते. पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागासाठी प्रमुख पाहुणे डेक्कन एज्युकेशन सोसायटी कौन्सिलचे सदस्य आणि विश्वस्त अनंत जोशी तर माध्यमिक विभागासाठी प्रसिद्ध अभिनेते संजय खापरे सपत्नीक उपस्थित होते. संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वागतगीताने झाली. याप्रसंगी शालान्त तसेच विविध स्पर्धांत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अनंत जोशी यांनी मुलांच्या सहज विकासाची प्रक्रिया गतिमान कशी करता येईल याविषयी सुभाषिते व कथांतून उलगडून दाखवले. याप्रसंगी ते म्हणाले, मुलांची शिकण्याची प्रक्रिया ही सहज होत असते. मुलांच्या जीवनशैलीतून ती आकार घेत असते. मुलांच्या आहार, विहार, अभ्यास या कृती विचारपूर्वक व्हायला हव्यात.
वार्षिक स्नेहसंमेलनाची यावर्षीची संकल्पना ‘विविधतेत एकता’ ही होती. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी, विविध भाषिक, प्रादेशिक विभिन्नता दर्शवणारी नृत्यगीते सादर केली. तसेच नाटक, गायन, वादन यांतून कलागुण सादर केले.
या कार्यक्रमप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. संजीव गोखले तसेच गरवारे फुलफ्लेक्सचे प्रतिनिधी जीवन कलाणे व प्रकाश पांचाळ आणि पालक प्रतिनिधी अभिषेक घागरे उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. अपुर्वा कुलकर्णी यांनी अहवाल सादरीकरण केले. सौ. रुपाली देसाई आणि सौ. अनघा जाेशी सूत्रसंचालन यांनी केले. सौ. स्नेहा पोळ व सौ. सोनाली शेलार यांनी आभार मानले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.