पुणे – नववर्षाच्या पहिल्या दिवशी शहर आणि उपनगरांतील नागरिकांनी मध्यवस्तीतील गणपती मंदिरांत गर्दी केली. या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. यामुळे मध्यवस्तीत वाहतुकीचा बोजवारा उडाला. शिवाजी रस्त्यालगतच्या गल्ली-बोळांत भाविकांनी बेशिस्तपणे वाहने लावली. त्यामुळे कोंडीत भर पडली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना गर्दीत अडकून पडावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
देवदर्शन करून नववर्षाचे स्वागत करण्याच्या परंपरेनुसार सोमवारी पहाटेपासून गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. नागरिकांनी आपली दुचाकी वाहने जवळपासच्या रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत लावली. आधीच अरुंद असलेले रस्ते वाहनांच्या गर्दीने वाहतुकीसाठी उरलेच नाहीत. परिणामी शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, आप्पा बळवंत चौक आणि मध्यवर्ती भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी शिवाजी रस्ता, आप्पा बळवंत चौक ते बुधवार पेठेतील हुतात्मा रस्ता, गणेश रस्ता वाहतुकीस बंद ठेवला होता. त्यामुळे दुचाकी गल्ली- बोळांत लावल्याने अन्य वाहनांना वाट काढणे अवघड झाले होते. यातच नाताळची सुट्टी असल्याने परगावातील नागरिक आणि शाळांच्या सहली शनिवारवाडा पाहण्यासाठी आले होते. त्यांच्या बस आणि विद्यार्थ्यांमुळे कोंडीत आणखी भर पडली. शनिवारवाडा पहाण्यासाठी आलेल्या नागरिकांना जवळपास मोठ्या पार्किंगची सोय नाही. शनिवारवाडा परिसरात मोजकीच वाहने लागू शकतात. यामुळे तेथे नेहमीच बेकायदा पार्किग होत असते.
कोरेगाव भीमा येथे पोलीस बंदोबस्त
कोरेगाव भीमा येथील नियोजनासाठी मागील दोन दिवसांपासून वाहतूक पोलीस ठिय्या ठोकून आहेत. सोमवारी जवळपास ७५ टक्के पोलीस नियोजनाच्या जागी आहे. यातील काही ३१ डिसेंबरचा बंदोबस्त करुन गेले आहेत. यामुळे शहरात नियोजनासाठी अपुरे मनुष्यबळ होते. त्यामुळे कोंडीत भर पडली. यामुळे पोलिसांना शिवाजी रस्ता वाहनांसाठी बंद करावा लागला