आणखी 657 नागरिक बाधित; 20 रुग्णांचा मृत्यू
सातारा – जिल्ह्यात काल (दि. 7) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 657 नागरिक करोना संक्रमित झाले असून, 20 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी रविवारी दिली.
जिल्ह्यात करोनाबळींचे प्रमाण वाढतेच असल्याने नागरिकांची चिंता कायम आहे. त्यामागील कारणांचा शोध घेऊन, मृत्युदर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि कंसात आजपर्यंतच्या बाधितांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – कराड 178 (35975), सातारा 117 (46352), फलटण 103 (31853), खटाव 73 (22284), कोरेगाव 55 (19585), वाई 40(14660), माण 35 (15259), खंडाळा 19 (13304), पाटण 16 (9697), जावळी 11 (9489), महाबळेश्वर 2 (4537) व इतर 8(1696), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 24 हजार 691 करोनाबाधित आहेत.
गेल्या 24 तासांत 20 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्याची तपशीलवार आकडेवारी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली नाही. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 5453 करोनाबळी झाले आहेत.
777 जण करोनामुक्त
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेतलेल्या 777 जणांना रविवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.