सातारा (प्रतिनिधी) – यंदाची दिवाळी बाजारपेठेसाठी शुभवार्ता घेऊन आली आहे. दुष्काळाच्या झळा सोसूनही रिअल इस्टेट, सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व वाहन खरेदी आदी क्षेत्रांत पंधरा टक्के वाढ नोंदविली गेल्याने व्यापारी वर्ग सुखावला आहे. सोने खरेदीचा पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी साताऱ्याची बाजारपेठ सज्ज झाली आहे. यंदाच्या दिवाळीत बाजारपेठेची उलाढाल वाढणार असल्याचे जिल्हा व्यापारी असोसिएशनच्यावतीने सांगण्यात आले.
आनंद, उत्साह आणि चैतन्याचा सण असलेला दीपावली सण जल्लोषात साजरा सुरू असताना दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीसाठी जिल्ह्याची बाजारपेठ सज्ज झाली आहे. वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तूसह बांधकाम व्यवसायात मोठी उलाढाल होण्याचे संकेत मिळत आहेत. इलक्ट्रिकल वाहनाना खरेदीत मिळणारी सवलत, सोने खरेदीसाठी दिवाळीत सराफ बाजारामध्ये उपलब्ध होणाऱ्या आकर्षक भिशी योजना तसेच वित्तीय संस्थांनी जाहीर केलेले सवलतीचे व्याजदर यामुळे गृह खरेदीची मोठी उलाढाल बाजारपेठेत दिसणार आहे. दिवाळी पाडव्यासह भाऊबीज या दोन दिवसांत केवळ साताऱ्याच्या बाजारपेठेत साधारण पंचवीस कोटीची उलाढाल होईल असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
दसऱ्याला वाहन खरेदीला चांगला प्रतिसाद लाभला होता. ग्राहकाकडून नवीन कार, नवीन बाइक बुकिंग झाल्या असून पाडव्यादिवशी शोरूममधून वाहन खरेदी करण्यासाठी ग्राहक उत्सुक आहे. बाइकमध्ये नवीन मॉडेल खरेदीकडे तरुणाईचा कल आहे. कारच्या शोरुममध्ये वाहनांची मॉडेल मांडण्यात आली आहेत. तर गोडाऊनमध्ये नवीन मोटारींच्या रांगा लागल्या आहेत. जुनी कार देऊन नवीन कार विकत घ्या, अशा ऑफरही काही एजन्सीजनी दिल्या आहेत. बॅंकाकडून लोनची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूच्या बाजारपेठेत खरेदीला ग्राहकांकडून सर्वाधिक पसंती मिळत आहे. दुकानात एलइडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन या वस्तू मांडण्यात आल्या आहेत. जुना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन खरेदीसाठी सूट दिली जात आहे. ऍटोमॅटिक वॉशिंग मशिन, डबल डोअर फ्रीजकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. व्यापाऱ्यांनी कॅशबॅक ऑफरही दिल्या आहेत. तसेच शून्य टक्के दराने डाऊन पेमेंटची सुविधा वित्तीय संस्था आणि बॅंकांकडून दिली जात आहे. मोबाइलमधील नवीन व्हर्जन बाजारात आले असून तरुणाईकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
सराफ कट्टा सज्ज
धनत्रयोदशीपासून सोने खरेदी सुरू झाली आहे. पाडव्याच्या महुर्तावर किमान एक ग्रॅम सोने खरेदीची परंपरा अनेक कुटुंबात असल्याने सराफ कट्टा सज्ज झाला आहे. सोने, चांदी, हिरे दागिन्यांच्या मोठ्या शोरुममध्ये खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सराफ बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेली दोन वर्षे नोटबंदी, जीएसटीमुळे बांधकाम व्यवसायात मंदी होती. पण आता फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांकडून विचारणा होऊ लागली आहे. जीएसटी अंमलबजावणीपूर्वी पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पातील तयार फ्लॅट खरेदीसाठी ग्राहकांची सर्वात जास्त पसंती आहे. अशा प्रकल्पात जीएसटी लागू होत नसल्याने अंदाजे दोन ते सव्वा दोन लाख रुपयांची बचत होत असल्याने ग्राहकांकडून फ्लॅट खरेदीसाठी विचारणा होत असल्याचे बांधकाम व्यवसायात समाधानाचे वातावरण आहे.