कोरेगाव : सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या त्यागातून उभी राहिलेली, संपूर्ण राज्यात विस्तार झालेली आणि वीस हजार कोटी रुपयांची मालमत्ता असलेली रयत शिक्षण संस्था आपल्या मुलीच्या आणि नातवांच्या नावे करण्याचा घाट घातला जात आहे.
सर्वसामान्यांच्या ताकदीच्या जोरावर हा प्रकार हाणून पाडणार आहे. ही संस्था सर्वसामान्यांचीच राहावी यासाठी मोहीम उघडणार आहे, असा इशारा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी खासदार शरद पवार यांचा नामोल्लेख टाळून दिला.
चिमणगाव, ता. कोरेगाव येथे विकासकामांचा शुभारंभ ना. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल ना. शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, हणमंतराव जगदाळे, जिल्हा परिषदेचेमाजी सदस्य पोपटराव करपे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष नीलेश यादव व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. शिंदे यांनी रयत शिक्षण संस्थेत सुरू असलेल्या गैरप्रकारांचा पाढा वाचला. रयत शिक्षण संस्था ही सर्वसामान्यांच्या त्यागातून उभी राहिली आहे. राज्याचा मुख्यमंत्री या संस्थेचा अध्यक्ष असला पाहिजे; परंतु ही संस्था आपल्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या ताब्यात राहावी यासाठी ही मंडळी कायद्यात बदल करू पहात आहेत. याबाबतचे सर्व पुरावे माझ्याजवळ आहेत. आज मराठा आरक्षणावर बोलणारी ही मंडळी रयत शिक्षण संस्था मात्र बहुजनांच्या ताब्यात ठेवू देत नाहीत.
देशात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना पुन्हा विराजमान करायचे आहे. जनता त्यासाठी आतुर आहे. विशेष करून माता, भगिनी पुढाकार घेत आहेत. राज्यात महायुतीचे 47 ते 48 खासदार यावेळी निवडून येतील. कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि महायुती सरकारच्या माध्यमातून कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे शब्द त्यांनी दिला.
महेश शिंदे यांचे चिमणगाव येथे आगमन होताच त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
भंडारमाचीतील पदाधिकार्यांचा प्रवेश
भंडारमाचीचे सरपंच समाधान मदने, ग्रामस्थ सोमनाथ मदने, अनिल मदने, रमेश मदने, मल्हारी मदने, सयाजी मदने, मोहन माकर, विकास मदने, कृष्णात मदने, विनोद मदने, संदीप मदने, ग्रामपंचायत सदस्य, चिमणगावचे रोहित सावंत, अधिक शिंदे यांनी या कार्यक्रमात ना. महेश शिंदे गटात प्रवेश केला. ना. महेश शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून, भंडारमाची, चिमणगाव पंचक्रोशीच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.