सातारा – गणेशोत्सवसाठी सुट्टीवर आलेल्या व्याजवाडी (ता. वाई) येथील जवानाने शुक्रवारी दुपारी 4.45 च्या सुमारास सातारा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय सुदाम कुदळे (वय 34, सध्या रा. अमरलक्ष्मी, प्रेरना सोसायटी, सातारा) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय कुदळे हे आयटीबीपीमध्ये सेवेत असून ते सुट्टीवर आले होते. सुट्टी संपवून पुन्हा हजर होण्यासाठी जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी शुक्रवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील अमरलक्ष्मी येथील प्रेरणा सोसायटीमध्ये राहत्या घरात छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली.
दरम्यान, ही घटना त्यांचे साडू भानुदास वाघ यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी कुदळे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी व्याजवाडी येथे नेण्यात आले. कुदळे यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.