कराड- कराड ते चांदोली रस्त्यावर काले गावच्या हद्दीत आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास एसटी- दुचाकीच्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या चंद्रकांत उर्फ बाबासो काकासो भोसले (वय 56, रा. धोंडेवाडी, ता. कराड) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीचालक किरकोळ जखमी झाला आहे.
याप्रकरणी आनंदा काकासो भोसले यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर आक्रमक नातेवाइकांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा देत काही काळ रास्ता रोको केला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तीन तासानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
याबाबत पोलीसांनी सांगितल की आनंदा भोसले त्यांचा भाऊ चंद्रकांत भोसले यांना घेऊन धोंडेवाडी ते नांदगाव रस्त्यावरुन दुचाकीवरून (एमएच 50 एच 3935) प्रवास करत होते. यावेळी कराड- चांदोली रस्ता ओलांडताना कराड आगाराच्या एसटी बसची (एमएच 40 एक्यू 6369) व दुचाकीची धडक झाली. अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. नांदगाव दूरक्षेत्राचे हवालदार प्रशांत जाधव तपास करत आहेत.