प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव – खटाव तालुक्यातील तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता बुद्धी वापरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती केल्यास ग्रामीण भागाचा कायापालट होईल, या हेतूने पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या ७६व्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेल्या राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात सुरू असलेला कृषिजागर राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहे.
देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव व विश्वस्त मंडळाने मठाधिपती सुंदरगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनामुळे लाखो शेतकन्यांचा आत्मविश्वास वाढविला असून पुसेगाव कृषी प्रदर्शनात झालेली गर्दी, अन्य संस्थांनाही अशा प्रदर्शनाच्या आयोजनाची प्रेरणा दिली आहे. या प्रदर्शनासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ , कृषी विभागाचे सहकार्य लाभत आहे.
या प्रदर्शनात अडीचशेहून अधिक स्टॉलमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसाठी नवनवीन औजारांचा खजिना, प्रगतिशील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतीमाल, आकर्षक फुलझाडे फळे, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागातून आलेल्या स्टॉल्सची पाहणी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. पाच दिवसांच्या या प्रदर्शनामुळे लाखो शेतक-यांपर्यंत शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान पोहोचत आहे.
प्रदर्शनाची व्याप्ती आणि प्रतिसाद पाहून हे प्रदर्शन निरंतर सुरू ठेवावे, अशी इच्छा स्टॉलधारकांनी व्यक्त केली आहे. वेगळी वाट चोखाळणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांना देवस्थान ट्रस्टच्यावतीने सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शासनाच्या कृषी विभागाचा सिंचनाचे महत्त्व पटवून देणारा स्टॉल, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा स्टॉल, मागेल त्याला शेततळे, सेंद्रिय शेती, जलयुक्त शिवार अभियानाचा देखावा असलेला स्टॉल व शासकीय योजनांच्या माहितीचे फलक लोकांना आकर्षित करत आहेत.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत जिल्हयातील शेतकऱ्यांच्या फळे -फुले भाजीपाला उत्पादनाचे नमुने ठेवण्यात आले आहे . त्यामध्ये अरविंद रद्युनाथ जाधव गिरवी यांची तैयवान पपई , बाळासाहेब कुंडलिक कदम परकंदी यांचे भावा डाळींब , संदिप महादेव पवार धमालवाडी यांचा तैयवान.पेरू , संदिप महादेव पवार धुमाळवाडी यांचा विदेशी आवळा , अशोक राघु बिचुकले यांचा ओडिंसा शेवगा , नवनाथ दत्तू फडतरे बेलवाडी याची देशी केळी ,
बाळकॄष्ण बंडगर होलेवाडी यांची पिवळी ढबू मिरची ठेवण्यात आली आहे . कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचा (आत्मा) स्टॉल, अॅग्रो हायटेकचा विक्रमी उत्पादनाची दिशा दाखवणारा स्टॉल, पशुसंवर्धन व आरोग्य विभागाच्या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांना माहिती मिळत आहे. चारचाकी वाहनांपासून खुरप्यापर्यंतच्या वस्तू, घरगुती वापराच्या वस्तू खाद्यपदार्थ, कपडे योग्य दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ट्रॅक्टर, बायोगॅस, कडबा कट्टी मशीन,
ऑस्ट्रेलियन ब्रह्मा सागवान रोपे, न संपणारी वही, सेंद्रिय पेरू, दर मिनिटाला पैसे कमावण्याचे टेक्निक, आटा चक्की, ठिंबक व तुषार सिंचन संच,मातीविना शेती करण्याचे तंत्रज्ञान आदी स्टॉलमध्ये कंपन्यांचे प्रतिनिधी आपापल्या उत्पादनांची वैशिष्ट्ये सांगत आहेत. निर्भया पथक, भारत संचार निगम, रसायनमुक्त शेतीची संकल्पना, भागातील शेतकऱ्यांची उत्पादने, जैविक खतांची माहिती दिली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी व जलसंधारण विभागामार्फत उभारण्यात आलेला जलयुक्त शिवार अभियानाचा देखावा शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे.प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे कष्टाचे चीज झाल्याची भावना रणधीर जाधव, विश्वस्त यांनी व्यक्त केली.
हिंदकेसरी गजेंद्र रेडा प्रदर्शनातील आकर्षण…
बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावच्या विलास गणपती नाईक यांचा हिंदकेसरी गजेंद्र रेडा प्रदर्शनातील आकर्षण ठरला आहे. रेडयाचे वजन दिड टन असून आतापर्यंट या रेड्याला दीड कोटीपर्यंत मागणी येऊन गेलेली आहे .