सातारा-पुणे मार्गावरील 90 टक्के दुहेरीकरण, विद्युतीकरण पूर्ण
लोणंद – पुणे ते सातारा रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम शिंदवणे ते आंबळे वगळता पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या पूर्वीप्रमाणे क्रॉसिंगसाठी न थांबता सुसाट वेगाने धावू लागल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील लोणंद ते पुणे रेल्वे प्रवास आता अवघ्या दोन तासांवर आला आहे. प्रवाशांनी जास्ती जास्त रेल्वे सुविधेचा उपयोग करुन रेल्वेने प्रवास करण्याचे आवाहन लोणंद प्रवाशी संघटनेने केले आहे.
सध्या लोणंदहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी 7.30 ला, 10. 40 ला दुसरी कोल्हापूर डेमू एक्सप्रेस, सव्वा एक वाजता कोयना एक्स्प्रेस, दर मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता मिरज -पुणे, तसेच रविवार वगळता सायंकाळी 7. 20 वाजता फलटण-पुणे एक्स्प्रेस डेमू, सायंकाळी 7.45 ला महाराष्ट्र एक्सप्रेस तर पुण्याहून येण्यासाठी पहाटे 4. 20 ला महाराष्ट्र एक्सप्रेस,
रविवार वगळता 6. 10 ला पुणे-फलटण डेमू एक्सप्रेस, सकाळी 10.40 ला पुणे कोल्हापूर, 12.40 ला कोयना एक्सप्रेस, 6. 30 ला पुणे-सातारा डेमू, दर मंगळवारी सकाळी 8 वाजता पुणे-मिरज एक्सप्रेस, तर ता 5 नोव्हेंबर पासून सुरु होणारी विशेष ट्रेन ( पूर्वीची सहयाद्री एक्सप्रेस ) पहाटे 5 वाजता लोणंदहून सुटेल तर पुण्यातून रात्री 9. 45 वाजता सुटणार आहे.
रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध आहेत. आता पूर्वीच्या पॅसेंजर प्रमाणे पुण्याला जाण्यास व येण्यास वेळ लागत नसून सर्व गाडया वेळेवर व पूर्वीपेक्षा कमी वेळेत पोहचत आहेत.फक्त 50 रुपये तिकीटावर कोणत्याही रेल्वेगाडीने जलद, सुखकर व सुरक्षित प्रवास रेल्वेने करता येणे शक्य झाले आहे. डेमू गाडयामध्ये भरपूर जागा उपलब्ध असल्याने प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही लोणंद प्रवाशी संघटनेकडून करण्यात आले आहे.
50 रुपयांमध्ये पुणे ते लोणंद प्रवास
लोणंद जंक्शनवरील उत्पन्न वाढून इतर सुपरफास्ट गाडयांनाही थांबा मिळविता येणे शक्य होणार असल्याने प्रवाशींनी अन्य पर्यायी वाहातूक व्यवस्थे ऐवजी शक्यतो रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा. डबल लाईनचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याने क्रॉसिंगला जाणारा वेळ वाचत असून प्रवासी फक्त दोन ते सव्वादोन तासात लोणंद-पुणे प्रवास करू शकत आहेत, तेही फक्त 50 रुपयांत तर लोणंद-पुणे हा मासिक पास फक्त 355 रूपयांत मिळत असल्याने कमी पैशात जलद व सुरक्षित प्रवास उपलब्ध झाला आहे. लोणंद, निरा परिसरातील पुण्यात शिकत असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी व दररोज कामानिमित्त पुणे येथे प्रवास करणारांना या सेवेचा मोठा लाभ होत आहे.